आणखी तीन संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त   

श्रीनगर : पहलगाममधील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोर्‍यात आणखी तीन संशयित दहशतवाद्यांची घरे अधिकार्‍यांनी उद्ध्वस्त केली. आतापर्यंत पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त  करण्यात आली.
 
पहलमागममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात एक परदेशी पर्यटक, दोन स्थानिकांचा समावेश होता. तर, अन्य २३ विविध राज्यांतून पर्यटनासाठी आले होते.शुक्रवारी रात्री दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यात कथित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याआधी, पहाटेच्या सुमारास पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयितासह लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांनी स्फोट घडवून उडविण्यात आली होती.
 
पुलवामा जिल्ह्यातील मुरान परिसरातील अहसान उल हक शेख याचे घर शुक्रवारी रात्री उद्ध्वस्त करण्यात आले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्याने २०१८ मध्ये पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. काही दिवसांपूर्वी त्याने काश्मीर खोर्‍यात घुसखोरी केली होती. शोपियान जिल्ह्यातील छोटीपोरा येथे अशाच एका कारवाईत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा सक्रिय कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.  गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता, असा दावा अधिकार्‍यांनी केला. कुलगाम जिल्ह्यातील मतलहामा भागात २०२३ पासून सक्रिय असलेला आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या झाकीर अहमद गनी याचे घरही रात्रीच्या वेळी पाडण्यात आले, असे त्यांनी सांगितले. 
 
आतापर्यंत पाच संशयित दहशतवाद्यांची घरे उद्धवस्त करण्यात आली आहेत. पहलगाम रक्तपात घडवून आणण्यात मदत केल्याचा आरोप असलेल्या आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांची बिजबेहरा आणि त्रालमधील घरेही स्फोटकांनी उडविण्यात आली. ही कारवाई करण्यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी घरातील रहिवाशांना तसेच शेजार्‍यांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती. 

Related Articles